डोंबिवली स्फोटाने 'तिचा' संसार अर्ध्यावरच

आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. प्रत्येक दिवस काय घेऊन येईल याची आपल्याला काहीच कल्पना नसते. असेच काहीसे डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नीलम देठेबाबत घडले.

Updated: May 27, 2016, 10:33 AM IST
डोंबिवली स्फोटाने 'तिचा' संसार अर्ध्यावरच  title=

डोंबिवली : आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. प्रत्येक दिवस काय घेऊन येईल याची आपल्याला काहीच कल्पना नसते. असेच काहीसे डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नीलम देठेबाबत घडले.

२६ मेचा दिवस इतका जीवघेणा ठरेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. नेहमीप्रमाणे ती सकाळी कामावर निघाली, मात्र घरी परत न येण्यासाठीच. ठाण्यात राहणारी नीलम हिचा विवाह दीड वर्षापूर्वी ऋषिकेश या तिच्या वर्गमित्राशी झाला होता. 

शिक्षण संपल्यानंतर २०१५ मध्ये या दोघांनी प्रेमविवाह केला. दोघांचाही सुखी संसार सुरु होता. मात्र संसाराचा डाव असा अर्ध्यावरच मोडला जाईल याची पुसटशी कल्पनाही दोघांना नव्हती. गुरुवारी सकाळी नीलम नेहमीप्रमाणे लॅबमध्ये कामाला आली. गेल्या एक-दीड वर्षांपासून ती रामसन्स परफ्यु्म्स येथे काम करत होती. 

दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या लॅबसमोरील कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या कंपन्यांचीही मोठी पडझड झाली. स्फोट झालेली प्रोबेट कंपनी अक्षरश: पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यासमोर असणाऱ्या रामसन्स कंपनीची एक भिंतच कोसळली. या अपघातात नीलम जबर जखमी झाली. तिच्या अंगात काचा घुसल्याने जखमा झाल्या तर एक हात निकामी झाला.

स्फोटाचा मोठा हादरा बसल्याने ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली. अखेर बऱ्याच वेळानंतर तिला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. तेथून तातडीने तिला फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा श्वास कोंडला गेल्यामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. दीड वर्षापूर्वी सुखी संसाराची स्वप्ने पाहत सुरु झालेला नीलम-ऋषीकेश यांच्या संसाराचा डाव काळाने असा अर्ध्यावरच संपवला.