www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
देशात सगळीकडेच आसाराम बापूंच्या गैरकारभाराचे किस्से चर्चेत असताना नाशिकमध्येही त्यांच्या आश्रमाचं अतिक्रमण हटवलं. यावेळी साधक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अखेर आश्रमाच्या व्यवस्थापनानं डीपी रस्ता मोकळा करून दिल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली.
नाशिकमध्ये आसाराम बापूंच्या आश्रमाचं अतिक्रमण हटवायला सकाळी सुरुवात झाली. नाशिकच्या गंगापूर रस्त्यावर आणि गोदाकाठावर आसाराम बापूंचा सहा एकरचा भव्य आश्रम आहे. गोदाकाठाला समांतर २४ मीटरचा रस्ता आणि आनंदवल्लीकडून येणा-या १८ मीटर रस्त्यावर आश्रमानं अतिक्रमण केलंय. हा रस्ता मोकळा करून घेण्यासाठी महापालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. यावेळी साधक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
या भागातल्या गणेशाच्या आणि शंकराच्या मंदिरामुळे अतिक्रमण पूर्णपणे हटवणं शक्य नाही. त्यामुळे तूर्तास आश्रमाच्या एका बाजूचा रस्ता मोकळा करून देण्यात येणार आहे. आसाराम बापू तुरुंगात असल्यानं नाशिक महापालिकेसाठी ही मोहीम सोप्पी झाली. पण इतके दिवस हे अतिक्रमण का हटवलं नाही, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.