कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुरते हैराण करणार अशा आविर्भावात असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत अजित पवार यांनी काँग्रेसला खिंडार पाडत ७ नगरसेवक राष्ट्रवादीत आणले आणि शहराचा मीच दादा हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं! काँग्रेसमधून हे नगरसेवक आले असले तरी दादांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि काही नगरसेवकांचा टप्प्या टप्याने प्रवेश घडवत भाजपने गेले काही दिवस राष्ट्रवादीला घरघर लागल्याचे चित्र निर्माण केले होते. त्यात त्यांना यश हे येत होते. पण या सर्व घडामोडी मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार मात्र शांत होते.
भाजपच्या आक्रमक हल्ल्यासमोर अजित पवार काहीसे बॅकफूटला गेलेत असं वाटत असताना अजित पवारांनी आज पिंपरीचा मीच ' दादा ' हे दाखऊन दिले. अजित पवारांनी काँग्रेसचा सात नगरसेवकांचा गट फोडत त्यांना पक्षात आणलं.
विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड मधले काँग्रेसचे ताकतवान नेते भाऊसाहेब भोईर यांच्या सह विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल भोसले, गणेश लोंढे, विनोद नढे, शकुंतला बनसोडे, गीता मंचरकर आणि विमल काळे या त्यांच्या वार्डात प्रचंड ताकत असलेल्या तगड्या नेत्यांना पवारांनी पक्षात खेचलंय.
अजित पवारांनी काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रवेश केले असले तरी त्यांच्या या खेळीने भाजप मात्र पुरती घायाळ झालीय...! आता पर्यंत जे भाजप प्रवेश झाले ते लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे खंदे समर्थक होते. त्यात राष्ट्रवादीच्या अनेकांनी प्रवेश केले असले तरी राष्ट्रवादीचा एकही तगडा स्थानिक नेता भाजप मध्ये गेलेला नाही..उलट जे नेते गेले होते त्यातल्या काहींनी घरवापसी केलीय तर काही घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळं भाजपची अवस्था अधिक बिकट झालीय. तर या प्रवेशामुळं आधीच मरणासन्न अवस्थेत गेलेल्या काँग्रेसला अखेरची घरघर लागल्याचे चिन्ह आहेत. एकूणच काय तर शहराचा मीच दादा हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणि पुन्हा एकदा शहराचे राजकारण पुन्हा स्वतः भोवती केंद्रीत केले.