राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या घरांवर छापे पडत असतानाचा नाशिक शहर जिल्हाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेत. 

Updated: Jun 17, 2015, 03:41 PM IST
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर title=

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या घरांवर छापे पडत असतानाचा नाशिक शहर जिल्हाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेत. 

भुजबळांवर सुरु असणारी कारवाई सूडबुद्धीने केल्याचं आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालासमोर ठियां मांडून कारवाईचा विरोध केला. अति उत्साही कार्यकर्ते आणि पोलीसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे जवळपास एक तास सीबीएस चौक ते मेहेर सिग्नल कडची वाहतूक ठप्प झाली होती आणि नाशिकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

छापे बारा तासपेक्षा अधिक काळ

नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्या निवासस्थानावर सुरु असलेले छापे बारां तासपेक्षा अधिक काळ सुरु होते. राजेशाही थाट असलेल्या भुजबळ फार्मवर लाचलुचपत विभागाची चौकशी उशिरा मध्यरात्रीपर्यंत सुरु होती.. या फार्मवरील ऐश्वर्याने अधिका-यांचे डोळे पांढरे झाले होते. कोट्यवधी रुपये किंमतीच्या पुरातन वस्तू, फाईव्ह स्टार सुविधा आणि राजेशाहीला साजेसा थाट झाडाझडतीच्या मागणी तपशिलात नोंदविण्यासाठी अपूर्ण पड़त होता.

नोंदीनुसार क्षेत्राचे  मोजमाप करून मालमत्तेची किंमत ठरविने विभागातील अधिकाऱ्यांना चक्रावणारा ठरला..  तब्बल  सोळा तास चाललेल्या या चौकशीत काही मालमत्तांची कागदपत्रं हाती लागलीत. वेगवेगळ्या नावावर असलेले साताबरे आणि बेनामी संपत्तीचे तपशील ईडीकडे सोपवण्यात येणार असल्याने भुजबळांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

लोणावळा फार्म हाऊस

लोणावळयापासून ३० किलोमीटर अंतरावर आचवण या गावातील भुजबळ यांच्या फार्म हाऊसचा पुणे युनिटमधील उपअधिक्षक शेटे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. फार्म हाऊस सीलबंद करण्यात आले नाही. मात्र, तेथे असलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, फार्म हाऊसमधून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. उपाअधिक्षक जे.डी. कळसकर आणि त्यांचे पथकाने भुजबळ यांच्या पुण्यातील संगमवाडी येथील प्लॉट नं. 153 वरील ग्राफीकॉन आर्केडमध्ये तिसर्या मजल्यावरील फ्लॅट नं. 208 चा सर्च घेण्यासाठी गेले होते. मात्र, फ्लॅट हा एका शैक्षणिक संस्थेला भाडयाने दिला असल्याचे निदर्शनास आले असून त्याला कुलुप होते. त्यामुळे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत एसीबीचे अधिकारी व कर्मचारी त्या फ्लॅटवर वॉच ठेवुन होते. 

भुजबळ यांच्याभोवतीचा फास 
राष्ट्रवादीतील पॉवरफुल नेते छगन भुजबळ यांच्याभोवतीचा फास एसीबीनं आवळला आहे. एसीबीच्या छापासत्राच्या पार्श्वभूमिवर छगन भुजबळ यांनी मी एक रुपयाही कोणाचा घेतला नाही, एक इंचाची जमीनीही कोणाची लाटली नसल्याचं भुजबळ यांनी झी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलंय. उच्च अधिकारी समितीचे हे निर्णय होते...आता कोर्टात लढाई लढू, असा बचाव भुजबळांनी केलाय.

१६ ठिकाणी छापे 
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर एसीबीनं तब्बल १६ ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये डोळे गरगरून जातील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलीय. या मालमत्तेची किंमत बाजारभावानं करोडो रूपयांच्या घरात आहे. यापैकी नाशिक येथील भुजबळ फार्ममधील भुजबळ पॅलेस हा बंगलाच तब्बल 100 कोटी रूपयांचा आहे, अशी माहिती एसीबीनं दिलीय. 46 हजार 500 चौरस फुटांच्या या बंगल्यात सुमारे 25 खोल्या आहेत. तिथं स्विमिंग टँक आणि जिमचे बांधकाम सुरू आहे. त्याशिवाय भुजबळ कुटुंबियांकडे तब्बल 6 बंगले, विविध इमारतींमध्ये 20 सदनिका आणि 10 व्यापारी गाळे आढळल्याची माहितीही एसीबीनं दिलीय... मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, येवला आणि मनमाड भागात भुजबळ कुटुंबियांनी ही माया गोळा केलीय...

येवल्यात छापा
मुंबई नाशिकसह येवला इथल्या छगन भुजबळ यांच्या निवासस्थानावर एसीबीच्या विशेष तपास पथकाने छापा घातला. मंगळवारी दुपारी १२ वाजता सुरु झालेली तपासणी-चौकशी रात्री १२ पर्यंत सुरु होती. येवला येथील भुजबळांचे निवासस्थान हे संपर्क कार्यालय नावाने ओळखले जाते. हे निवासस्थान पंकज भुजबळ यांच्या नावे असून सुमारे 5 हजार चौरसफुट बांधकाम अन् ११ खोल्या यामध्ये आहेत. या कार्यालयातील पंखा, लाईट बल्व पासून प्रत्येक वस्तूंची नोंद करण्यात आली. सलग १२ तास ही तपासणी सुरु होती. यामध्ये अनेक कागदपत्रे तपासण्यात आली.

शरद पवार यांचे मौन 
भुजबळांच्या मालमत्तेवर छापासत्र सुरु असताना शरद पवार यांनी मात्र मौन बाळगलंय. एमसीएमच्या निवडणुकी निमित्त पवार यांनी पत्रकार परीषद घेतली मात्र क्रिकेटवर मी बोलणार असं पवारांनी स्पष्ट केलंय. भुजबळ यांच्यावरील कारवाई प्रकरणी शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. पण पवार यांनी काही बोलण्यास नकार दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.