नितीन पाटणकर, झी मी़डिया, पुणे : पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने शेंगा विक्रेता ते पुण्याचा उपमहापौर अशी थक्क करणारी कारकीर्द आज कायमची थांबली. कांबळे यांच्या चाळीस वर्षांच्या संघर्षमय कारकिर्दीचा हा आढावा...
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर रुबी हॉस्पिटलमध्ये अशी गर्दी झाली होती. ही गर्दी म्हणजे, कांबळे यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची साक्षच म्हणायला हवी. दुष्काळ आणि हलाखीची परिस्थिती, यामुळे विठ्ठल कांबळे १९७२ मध्ये कुटुंबासह मराठवाड्यातून आळंदीला आले. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या मागे उघड्यावरच हे कुटुंब राहत होतं. त्यावेळी, नवनाथ कांबळे आई बरोबर शेंगा विकायचे. पुढे आळंदीतून कांबळे कुटुंब पुण्यात आलं. पुण्यात आले तरी परिस्थिती हलाखीचीच होती... अशा परिस्थितीतही काम करत नवनाथ कांबळे यांनी पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं... काम आणि शिक्षणाबरोबरच कांबळे यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य सुरु होते... त्यात त्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मित्र जोडले.
दलित पँथरमधून नवनाथ कांबळे यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली. पुढे नामांतर आंदोलनात ते सहभागी झाले. नामांतर आंदोलनात त्यांना तुरुंगवासही झाला. १९८३ ते ८५ या काळात ते भारतीय दलित पँथरचे पुणे शहराचे अध्यक्ष होते. पुढे ते रामदास आठवले यांच्याबरोबर रिपब्लिकन पक्षात गेले. १९९० ते ९५ या काळात नवनाथ कांबळे आरपीआयच्या आठवले गटाचे शहराध्यक्ष होते. १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर २००२ मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यावर ते शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष झाले. २०१७ मध्ये तिसऱ्यांदा ते नगरसेवक झाले. त्यावेळी नवनाथ कांबळे यांच्या रूपाने आरपीआयला प्रथमच पुण्याचं उपमहापौरपद मिळाले. या कारकिर्दीत कांबळे यांनी अनेक कार्यकर्ते जोडले अनेक कार्यकर्त्यांना उभं केलं. त्यांची कारकीर्द घडवली.
जवळपास चाळीस वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत नवनाथ कांबळे सतत समाजासाठी झगडत होते. त्यामुळेच त्यांची उपमहापौर निवड झाल्यावर समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला. अशी भावना व्यक्त केली गेली. नवनाथ कांबळे यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर हॉस्पिटल आणि त्यांच्या घरी झालेली गर्दी नवनाथ कांबळे कार्यकर्त्यांशी - समाजाशी किती जोडले गेले होते याचीच साक्ष मिळते... नवनाथ कांबळे यांचा अचानक झालेला मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे.