नाशिक पालिकेत खडखडाट, पदाधिकाऱ्यांची कोट्यवधींची उधळपटी

महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वाहनातून दरवर्षी कोट्यवधींचा धूर काढलाय. माहिती अधिकारात ही माहिती उघड झालीय. एकीकडे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना महापालिका पदाधिकाऱ्यांची इंधनावरुन उधळपट्टी सुरू आहे.   

Updated: Jan 22, 2016, 07:12 PM IST
नाशिक पालिकेत खडखडाट, पदाधिकाऱ्यांची कोट्यवधींची उधळपटी title=

नाशिक : महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वाहनातून दरवर्षी कोट्यवधींचा धूर काढलाय. माहिती अधिकारात ही माहिती उघड झालीय. एकीकडे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना महापालिका पदाधिकाऱ्यांची इंधनावरुन उधळपट्टी सुरू आहे.   

नाशिक महापालिकेचे पदाधिकारी आपल्या गाडीतून दरवर्षी कोट्यवधींचा धूर काढतात. नाशिक महापालिकेने आरटीआयमध्ये दिलेली ही माहिती पाहिली तर तुम्ही चक्रावाल. महापौरांच्या दोन गाड्यांवर झालेला खर्च.

2012 साली महापौरांनी 1469 लीटर पेट्रोल तर 928 लीटर डिझेल खर्च केलंय. 
2013 मध्ये 993 लीटर पेट्रोल आणि 1560 लीटर डिझेल खर्च झालंय. 
2014 मध्ये 2459 लीटर पेट्रोल आणि 1438  लीटर डिझेल खर्च झालंय

तीन वर्षात महापालिकेच्या केवळ पाच पदाधिका-यांच्या वाहनांनी तब्बल 5 कोटी 15 लाख रूपयांचा धूर काढलाय. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, शिक्षण मंडळ सभापती यांच्या वाहनांचा तपशीलच आरटीआयमध्ये देण्यात आलाय.

 

गेल्या तीन वर्षातला खर्चाचा हा आकडा पाहिल्यामुळे पदाधिकारीही हादरले आहेत. शिक्षण मंडळ सभापतीपद गेल्या दोन तीन वर्षांपासून रिक्त होतं. इंधनाच्या खर्चाच्या यादीत या वाहनाचा उल्लेख आला असल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.. या मुळे सारवासारव करताना हा खर्च वरिष्ठ अधिकारी, खातेप्रमुख, रूग्णवाहिका अशा सर्व वाहनांसाठी मिळून झाला असल्याचा दावा महापौरांनी केलाय. 

माहिती देताना महापालिका प्रशासनाकडून संशयास्पदरित्या लपवाछपवी केली जाते तसंच अर्धवट माहिती दिली जाते असा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय. नाशिक शहराचा व्यास केवळ 20 किलोमीटरचा आहे. त्यामुळे एवढ्या लहान परिघात एवढ्या महागड्या दौ-यांनी नाशिककरांना नेमका किती फायदा करून दिला हे मात्र अनाकलनीय आहे.