नाशिक : संपूर्ण देशाला चलन पुरवठ्याचे काम करणाऱ्या करन्सी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना सुट्या नोटांची अडचण भासत आहे. अहोरात्र काम सुरु असल्याने बँकेत केव्हा जायचे आणि कुटुंबाला लागणारे घरखर्च कस भागवायचे असा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकाराने या सर्व कर्मचाऱ्यांना सुटे शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा द्यावे, अशी मागणी होते आहे
भारतीय प्रतिभूती मुद्रनालायासमोरील परिसरातील मोठी रांग ही सुटे पैसे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी लावली आहे. याच प्रेसच्या करन्सी विभागात सध्या वीस शंभर आणि पाचशेच्या लक्षावधी नोटा छापल्या जात आहेत. हे छापणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र चलन उपलब्ध होत नसल्याच या रांगेतून दिसून येत आहे.
नुकतेच या महामंडळाचे सी एम डी गर्ग यांनी नोटा छापण्याच्या या प्रेसला भेट दिली. त्यात वेगाने काम दुप्पट करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक वेगाने ओव्हर टाईम करून काम करावे लागणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना दिलासा देण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
सध्या देशातील बँकात आणि एटीएमसमोरील रांगा कमी करण्यात याच कर्मचाऱ्यांनी सिंहाचा वाट उचलला आहे, सरकारने आता या प्रेसच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.