बांधकाम करताना सापडले 'नहर ए अंबरी'चे नवे अवशेष, पण...

औरंगाबाद म्हणजे इतिहासाचं एक जिवंत आगार... या शहराला 'हेरिटेज सिटी' म्हणूनही ओळखलं जातं... तर 'राज्याची पर्यटन राजधानी' म्हणूनही या शहराची ओळख आहे. मात्र, इथंच इतिहासाची हेळसांड सुरु असल्याचं आता समोर येतंय.

Updated: Nov 21, 2016, 06:50 PM IST
बांधकाम करताना सापडले 'नहर ए अंबरी'चे नवे अवशेष, पण...  title=

विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबाद म्हणजे इतिहासाचं एक जिवंत आगार... या शहराला 'हेरिटेज सिटी' म्हणूनही ओळखलं जातं... तर 'राज्याची पर्यटन राजधानी' म्हणूनही या शहराची ओळख आहे. मात्र, इथंच इतिहासाची हेळसांड सुरु असल्याचं आता समोर येतंय.

अवशेषांची तोडफोड

ऐतिहासिक 'नहर ए अंबरी'च्या अवशेषांची खोदकाम करताना अशी दूरवस्था झालीय. औरंगाबादच्या ऐतिहासिक अशा किले अर्क भागात एका सभागृहाचं बांधकाम सुरु आहे. यासाठीच खोदकाम करताना नहर ए अंबरीचे अवशेष आढळले. मात्र बांधकाम करणाऱ्यांच्या हे काही लक्षात आलं नाही आणि प्रचंड प्रमाणात या अवशेषांची तोडफोड झाली.

दुर्मिळ अवशेष सापडले पण...

ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे, त्या परिसराचे नाव 'किले अर्क' आहे. हा भाग औरंगजेबाचा किल्ला होता. त्याच्याच मागे औरंगजेबानं त्यांची मुलगी झेबून्नीसासाठी बांधलेला जनाना महलही आहे. याच दोन महालात पाणी खेळवण्यासाठी मलिक अंबरनं बांधलेल्या 'नहर ए अंबरी'चं पाणी या महलांमध्ये वळवण्यात आलं होतं. मात्र कालांतरानं महालांची दूरवस्था झाली आणि हे अवशेषही जमिनीखाली गाडल्या गेले. आता बांधकाम करताना ते पुन्हा उजेडात आले, मात्र प्रचंड दूरवस्थेत...

इतिहासाबद्दल संभ्रम...

इतकं असूनही प्रशासन मात्र हे खरंच 'नहर ए अंबरी'चा मार्ग आहे का? या संभ्रमात आहे. कंत्राटदारांनं तूर्तास काहीतरी एतिहासिक ठेवा असल्याचं लक्षात आल्यानं त्या ठिकाणंच काम थांबवल आहे. हा भाग नहर ए अंबरीचा आहे की नाही? यावर सिडको आणि बांधकाम विभाग खाजगीत प्रश्न उभे करतायत. मात्र हा भाग 'नहर ए अंबरी'चाच असल्याचं प्रख्यात इतिहास अभ्यासक आणि इतिहासकार दुलारी कुरेशी यांनी म्हटलंय.

400 वर्ष जुन्या भग्न वास्तू

अगदी नहरीचा पाईप महलातून बाहेर आल्याचा अंदाज सहज बांधता येईल मात्र याकडं जणू कुणालाच लक्ष द्यायचे नाही असं चित्र आहे.या सगळ्या भग्न होत असलेल्या वास्तू 400 पेक्षा जास्त वर्ष जुन्या आहेत मात्र दुर्दैवानं त्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याची खंत इतिहासाचे अभ्यासक व्यक्त करतात.

ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय...

खरं तर नहर ए अंबरीची अवस्था अजूनही कित्येक ठिकाणी बरी आहे. त्यातून अजूनही पाणी वाहतंय मात्र तरी सुद्दा याकडं शासनाला लक्ष द्यायचं नाही. फक्त 'नहर ए अंबरी'चीच ही अवस्था नाही तर शहरातील प्रसिद्ध असा काला चबुतरा महापालिकेनं जमिनदोस्त करून टाकलाय.

'नहर ए अंबरी' असो वा काला चबुतरा दोन्ही शहरांसाठी अनमोल ठेवा होता. मात्र, ऐतिहासिक ठेवा नष्ट होत चाललेत. शहराचे प्रशासन, पुरातत्व विभागही याचे जतन करण्याऐवजी याला नष्ट करण्यास मदतच करत असल्याचं दिसतंय. त्यामुळं खरंच हा प्रकार असाच सुरु राहिला तर या शहराचा इतिहासच पुसल्या जाण्याचा धोका आहे. तातडीनं या ऐतिहासिक अशा नगरीला वाचवण्यासाठी आता तरी शासनानं डोळे उघडावे हीच अपेक्षा...