नागपूर: एका विवाहितेवर टाट मॅजिक या सहा सिटरच्या ऑटो चालकानं गाडीत एकटी बसल्याचं पाहून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्हात खापरखेडाजवळ घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल गिरे या बलात्कार करणाऱ्या ऑटोचालकाला अटक केली आहे.
पीडित महिला अमरावती इथं आपल्या आई-वडिलांकडे राहायची, या महिलेचा पती पिपलडोह सिहोरा मध्यप्रदेश इथं राहत असल्यानं बडनेरा इथून रेल्वेनं पांढुर्णा इथं जाण्यासाठी निघाली होती. मात्र, प्रवासात तिला झोप लागल्यानं ती पांढुर्णाऐवजी नागपूर रेल्वे स्टेशनवर उतरली. सदर महिलेला चूक लक्षात आल्यावर खापरखेडा इथं मामाच्या घरी जाण्यासाठी नागपूर बसस्थानकावर आली. त्याकरता रात्री ९.३० च्या दरम्यान अनिल अशोक गिरे हा आपली टाटा मॅजिक गाडी (क्र. एमएच ३२- बी८६१) प्रवासी घेण्यासाठी उभा होता. आरोपी अनिलनं या महिलेला खापरखेडा जात असल्याचं सांगितल्यावर ती त्याच्या गाडीमध्ये बसली.
यावेळी अनिलच्या गाडीमध्ये पीडित महिलेसह कोराडी महादुल्याचे सहा प्रवासी बसले होते. इतर प्रवासी उतरल्यानंतर सदर महिला ऑटोमध्ये एकटीच होती. नराधम ऑटोचालकानं रात्री १० वाजेच्या सुमाराला कोराडी-खापरखेडा मार्गावरील कोलार नदीच्या पुलाजवळ या महिलेवर दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर या ऑटोचालकानं या महिलेला एकटीला सोडून पळ काढला. घडलेल्या प्रकारामुळं भेदरलेल्या महिलेनं स्वत:ला सावरत नांदा शिवार गाठलं. याठिकाणी गावकऱ्याना आपबिती सांगितल्यानंतर त्यांनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला.
मध्यरात्रीच्या सुमाराला या महिलेनं खापरखेडा पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून अनिल अशोक गिरे याला अटक करून त्याचं वाहन जप्त केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.