नागपूर: गेले अनेक वर्ष जिथे रोजीरोटी कमावली, ते घरदार अचानक सुटलंय. ही व्यथा आहे नागपुरातल्या गंगा-जमुना वस्तीतल्या एका वेश्येची... गेली अनेक वर्षं इथे वेश्याव्यवसाय सुरू आहे. पण आता वेश्या, स्थानिक महिला आणि पोलीस असा संघर्ष सुरू झालाय.
नागपूरच्या या गंगा जमना वस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या अर्चनाला आता पुढे काय करायचं, हा प्रश्न पडलाय. गेल्या काही पिढ्यांपासून सुरु असलेल्या या वेश्या व्यवसायाला अवैध ठरवत पोलिसांनी कारवाई केलीय. त्यामुळे अचानक घर-दार सोडून जायचं कुठे, असा प्रश्न अनेकांना पडलाय.
दुसरीकडे मात्र याच भागात राहणाऱ्या काही महिलांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलंय आणि हा व्यवसाय कायमचा बंद करण्यासाठी या महिलांनी कंबरच कसलीय.
कायद्यातल्या तरतुदींअंतर्गतच कारवाई केल्याचा पोलिसांचा दावा आहे. नागपूरच्या या मोहल्ल्यात गेल्या अनेक दशकांपासून वेश्याव्यवसाय सुरु आहे. या भागात काम करणाऱ्या रेड क्रॉस सोसायटीनं दिलेल्या माहितीप्रमाणे इथं सुमारे २,५०० महिला देह विक्रीचा व्यवसाय करतात आणि सुमारे १५,००० पुरुष या भागात येतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.