नांदगाव नगरपालिकेत आघाडी विरुद्ध सेनेत सरळ लढत

ओबीसी प्रवर्गासाठी  राखीव  झाल्याने  अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार पंकज  भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Updated: Nov 23, 2016, 07:58 PM IST
नांदगाव नगरपालिकेत आघाडी विरुद्ध सेनेत सरळ लढत title=

निलेश वाघ, नांदगाव : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव  नागरपालिकेचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी  राखीव  झाल्याने  अटीतटीच्या  लढतीत राष्ट्रवादीचे आमदार पंकज  भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी  विरुद्ध  शिवसेना  अशी सरळ लढत होणार आहे.तर भाजप येथे  स्वतंत्र्यपणे लढताना दिसत आहे. 

पंकज भुजबळांची प्रतिष्ठा पणाला

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव नगरपालिकेवर आमदार पंकज भुजळांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. आता पुन्हा एकदा पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. काँग्रेससोबत आघाडी करत राष्ट्रवादीनं माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. सत्ता काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर नांदगावकर पुन्हा राष्ट्रवादीला संधी देईल असा विश्वास राष्ट्रवादीनं व्यक्त केलाय. 

राज्यात युती असताना नांदगावमध्ये सेना-भाजप एकमेकांसमोर उभे ठाकलेत. रिपाइ आठवले गटाला बरोबर घेतल्यानं शिवसेनेची काहीशी ताकद वाढलीय. जनसेवा मंडळाच्या सामाजिक कामामुळे सतत नागरिकांच्या संपर्कात राहणारे माजी नगराध्यक्ष राजेश उर्फ बबीकाका कवडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. गत पंचवार्षिकमध्ये कवडे राष्ट्रवादीत होते. नांदगाव शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्यानं राजेश कवडे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेत नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्याची शाश्वती आपण देत असल्यानं जनता सेनेलाच निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.  

तर भाजपनं केंद्र आणि राज्याप्रमाणं जनता भाजपलाच साथ देईल असा विश्वास व्यक्त केलाय. संजय सानप यांना भाजपनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. 
 
राष्ट्रवादीला मात्र बंडखोरीचं ग्रहण लागलंय. राष्ट्रवादीच्या शिवाजी पाटील यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केलीय. त्यांच्या उमेदवारीनं निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालीय. पाटील यांची उमेदवारी कुणाला फायदेशीर ठरेल आणि विजयाचं गणित कुणाचं चुकवेल हीच सध्या नांदगावात चर्चा आहे.  
           
पंचरंगी लढतीत नांदगावची जनता कुणाच्या पारड्यात मतांचा जोगवा टाकते हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.