नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेएनयू वादावर अखेर मौन सोडलंय. आपल्या देशातील नव्या पिढीला “भारत माता की जय” असं म्हणा हे सांगावं लागते, ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत व्यक्त करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज अप्रत्यक्षरित्या जेएनयूमधील आंदोलनावर निशाणा साधला.
डॉ. भागवत म्हणाले, “मातृशक्तीचं महत्त्व पटवून देण्याची गरज नसावी. घरातील मातेपासून मातृभूमीपर्यंत मातेचा जयजयकार करणं ही स्वाभाविक बाब असायला हवी. पण, आपल्या देशात “भारत माता की जय” म्हणा असं सांगण्याची वेळ आज आली आहे. कारण असं म्हणू नका हे सांगणारे लोकही या देशात आहेत आणि ते जास्त दृष्टीत पडतात.”
जेएनयू वादावर आतापर्यंत भागवत यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. ते आज नागपुरात पहिल्यांदाच अप्रत्यक्षरित्या का होईना पण याविषयावर बोलले.
रेशीमबाग इथल्या गजानन महाराज मंदिरात मातृशक्ती पुरस्कार सोहळ्यात मोहन भागवत बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना डॉ. भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाच्या अटकेनं विद्यार्थी संतापलेले अनेक विद्यार्थी संघाला टार्गेट करत आहेत. याला संघाचा छुपा एजेंडा असं अनेकांचं म्हणणं आहे. जेएनयू वादावर विरोधक आधीच मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत. संसदेतही यावरूण रणकंदन माजलंय. अशात मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानं वाद आणखी वाढण्याची शक्यता आहेत.