मुंबई : मनसेतून शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख तसेच नाशिकचे मनसे नगरसेवक शोभना शिंदे आणि नीलेश शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती भगवा देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी मनसेत गळचेपी होत असून हा पक्ष जनतेला न्याय देऊ शकत नाही, अशी टीका केली होती.
मनसेने सत्ता मिळवूनही नाशिकमध्ये गेल्या अडीच वर्षांत कुठलीही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे नाशिककरांचा भ्रमनिरास झाला असून नाशिकच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असे सांगत मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि नगरसेविका शोभना शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महेश बडवे, बाळासाहेब कोकणे उपस्थित होते.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेसोबत भाजप एकत्र आला आहे. सर्व संभ्रम दूर झाले आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेवर युतीचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.