जेजुरी : सोपानदेवांच्या सासवडनगरीतून माऊलींचा पालखी सोहळा आज दाखल झाला तो खंडेरायाच्या जेजुरीनगरीत. जेजुरीत खुद्दः वरूणराजाच वारक-यांच्या स्वागतासाठी हजर होता.
यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत सासवडहून माऊलींचा पालखी सोहळा मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीत दाखल झाला. जेजुरीत थेट वरूणराजाच स्वागतासाठी दाखल झाल्याने वारकरीही चिंब झाले. खरंतर पावसाच्या हजेरीत वारीच्या वाटेवर चालणं ही एक प्रकारे सत्वपरीक्षाचं. मात्र मुखामध्ये माऊली तुकोबा विठोबाचं नामस्मरण आणि मनाला लागलेली पंढरीची आस यामुळे वारकरी भक्तीरसात चिंब होऊन जातो, याचच दर्शन जेजुरीतही पहायला मिळालं.
तल्लीन होऊन निघालेल्या वारक-यांच्या स्वागतासाठी जेजुरीत आणखी एक अनोखं दृष्य पहायला मिळालं. शंभरवर्षांच्या आजीबाई आणि त्यांची आठ वर्षांची नात मोठ्या उत्साहात आपल्याहातूनही वारक-यांची थोडीशी का होईना सेवा घडावी म्हणून आनंदाने या मेळ्यात सहभागी झाल्या होत्या
माऊली चँरिटेबल आणि मेडिकल संस्थेतर्फे वारक-यांची आरोग्य तपासनी केली गेली यामध्ये युवा डॉक्टर्स आस्थेवाईकपणे वारक-यांची सेवा करताना दिसले .
एकूणच गेल्या काही दिवसात सासवड जेजुरी परिसरात शेतकरी वरूणराजाची वाट पहात होती. ऐन संतांचा मेळा दाखल झाला आणि वरूणराजानेही आपली हजेरी लावल्याने गावक-यांमध्येही दामदुपटीने उत्साह वाढला.