नागपूर : हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे विरोधक चांगलेच आमक्रमक झाले. सकाळी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या.
सरकारचा निषेध करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. विधानपरिषदेतही नोटबंदीच्या मुद्याचे पडसाद उमटले. या मुद्यावर स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी विधानपरिषदेत केली. मात्र तीही फेटाळली गेली. दरम्यान नोटबंदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय सामान्य आणि कष्टकरी यांच्यासाठी मारक असल्याचं सांगत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर नोटबंदी आणि सहकारी बँकांवरच्या निर्बंधांमुळे सामान्यांची ससेहोलपट होत असल्याचं सांगत, नारायण राणेंनी सरकारवर टीकेची तोफ डागली.