दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'डिसॅलिनेशन' प्रकल्प पुन्हा चर्चेत

अपुरा पाऊस आणि दुष्काळ हे प्रश्न सातत्यानं महाराष्ट्राला ग्रासतायत. या प्रश्नाला उत्तर शोधण्याचे प्रयत्नही राज्यात झाले. त्यातलीच एक कल्पना म्हणजे 'डिसॅलिनेशन' प्रकल्प...

Updated: Aug 28, 2015, 04:03 PM IST
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'डिसॅलिनेशन' प्रकल्प पुन्हा चर्चेत  title=

मुंबई : अपुरा पाऊस आणि दुष्काळ हे प्रश्न सातत्यानं महाराष्ट्राला ग्रासतायत. या प्रश्नाला उत्तर शोधण्याचे प्रयत्नही राज्यात झाले. त्यातलीच एक कल्पना म्हणजे 'डिसॅलिनेशन' प्रकल्प...

समुद्राचं खारं पाणी गोडं करून वापरण्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र चर्चेच्या पुढं काहीच होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव... मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आलीय. त्यामुळं समुद्राच्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची चर्चा पुन्हा रंगू लागलीय. 

मुंबईत डिसॅलीनेशन प्रकल्प उभारण्याची संकल्पना काही नवी नाही. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय बीएमसीचे आयुक्त असताना मुंबईत पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई डिसॅलिनेशन प्रकल्प उभारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर याकडं दुर्लक्षच झालं. 

भारतात चेन्नई महापालिका डिसॅलिनेशनद्वारे पाणी उपलब्ध करून देते. युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्येदेखील याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. 

डिसॅलिनेशन प्रकल्पांमध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर वारंवार खर्च करण्याची वेळ येत नाही, हे जगभरात सिद्ध झालंय. सध्या कमी पडणारा पाऊस आणि बेभरवशाचा कृत्रिम पावसाचा प्रयोग या पार्श्वभूमीवर डिसॅलिनेशन प्रकल्पाची नितांत गरज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.