मुंबई : महाराष्ट्रात मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही. या मुलांची गणना यापुढे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुपात होणार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय.
याचाच अर्थ, महाराष्ट्र सरकारनं मदरशांना दिला जाणारा शाळेचा दर्जा संपुष्टात आणलाय.
फडणवीस सरकारनं मदरशांना नॉन स्कूल श्रेणीमध्ये टाकलंय. यामुळे, सध्या मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना मेनस्ट्रीम शिक्षण व्यवस्थेत आणण्यात मदत मिळेल, असं महाराष्ट्र सरकारनं म्हटलंय. मदरशांमध्ये केवळ धार्मिक शिक्षण दिलं जातं, मात्र मुख्य प्रवाहातील शिक्षण दिलं जात नाही, असं सरकारनं म्हटलंय. यामुळेच, यापुढे मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांची गणना विद्यार्थी म्हणून करण्यास नकार दिलाय.
महाराष्ट्र सरकारनं मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना 'आऊट ऑफ स्कूल चिल्ड्रन' म्हणून घोषित करण्याचे आदेश दिलेत. राज्य सरकार ४ जुलै रोजी या संदर्भात एक सर्व्हे करणार आहे. त्यामुळे 'आऊट ऑफ स्कूल चिल्ड्रन'ची गणना होऊ शकेल तसंच त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण व्यवस्थेत आणलं जाऊ शकेल.
चार जुलैपासून विद्यार्थ्यांची गणना सुरू होईल मात्र यात मदरशांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होणार नाही. राज्यात एकूण १८९५ मदरसे आहेत ज्यामध्ये २ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.