नागपूर : मुलीने कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी वधूच्या दिराचा खून केल्याची घटना येथे घडली.
सौरभ गोईकर असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. दशरथ चिंचोळे याने सौरभची हत्या केली. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील काशीबाई देऊळ जवळ गोईकर कुटुंबीय राहते. या कुटुंबातील मोठा मुलगा शुभमने गेल्या आठवड्यात याच परिसरातील रोशनी नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह केला.
गोईकर कुटुंबीयांनी लग्नानिमित्त घरी पूजा ठेवली होती. याच कार्यक्रमात रोशनीच्या वडिलांनी येऊन गोईकर कुटुंबियांना शिवीगाळ सुरु केली. आणि सोबत आणलेल्या चाकूने सौरभच्या पोटावर वार केले आणि घटना स्थळाहून पळ काढला.
जखमी सौरभला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सौरभचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी दशरथ चिंचोळेचा शोध घेत आहेत.