सृष्टीनं कायम केला 'लिम्बो स्केटिंग'चा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड!

'लिम्बो स्केटिंग'सारख्या कठिण खेळात नागपूरच्या एका चिमुकलीनं विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. सृष्टी शर्मा असं या चिमुरडीचं नाव आहे. 

Updated: Oct 10, 2015, 01:36 PM IST
सृष्टीनं कायम केला 'लिम्बो स्केटिंग'चा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड! title=

नागपूर : 'लिम्बो स्केटिंग'सारख्या कठिण खेळात नागपूरच्या एका 11 वर्षांच्या चिमुकलीनं विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. सृष्टी शर्मा असं या चिमुरडीचं नाव आहे. 

केवळ 17 सेंटीमीटर उंचीच्या बारमधून सृष्टीने 25 मीटर लांब अंतर लिम्बो स्केटींग करत पार करत याआधीचे सगळे रेकॉर्डस् मोडीत काढलेत. सृष्टीच्या हा विक्रम 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवण्यात येणार आहे. वर्धमाननगर येथील सेंटर पॉईंट शाळेत शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सृष्टीने हा विक्रम प्रस्थापित केलाय. 

सृष्टीचे वडील धर्मेंद्र शर्मा हे एका कोळसा खाणीत ड्रायव्हरचं काम करतात. उल्लेखनीय म्हणजे, सृष्टीनं याआधीही लिंबो स्केटिंगमध्ये यापूर्वी 'दहा मीटर्स' च्या क्षेत्रात 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये विक्रम प्रस्थापित केला होता. 23 ऑगस्ट 2014 रोजी हिंदी मोरभवन सभागृहात लिम्बो स्केटिंगमध्ये दहा मीटरचे अंतर 16.5 सेंटीमीटर उंचीच्या बारमधून पूर्ण करीत विक्रम केला होता. 

यापूर्वी, 25 मीटर अंतर चेन्नईच्या मॅडविन डिव्हाने 22.86 सेंटीमीटर उंचीच्या बारमधून लिम्बो स्केटिंग करत पूर्ण केलं होतं. मात्र, सृष्टीनं आज अगोदर 19 सेंटीमीटर बारमधून लिम्बो स्केटींग करत 25 अंतर पार करत पहिल्याच संधीत विक्रम केला. त्यानंतर तिने 18 सेंटीमीटर बारमधून जात स्वत:चा विक्रम मोडीत काढला. पण, इथंच न थांबता तिनं पुढच्या संधीत 17 सेंटीमीटर उंचीच्या बारमधून लिम्बो स्केटिंग पार करत आणखी एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. 

सृष्टीच्या पराक्रमामुळे जागतिक स्तरावर नागपूरचा लौकिक वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केलीय.   

 
 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.