मुंबई-पुण्यात वाढतेय स्थलांतरितांची संख्या...

तीव्र पाणी टंचाई आणि हाताला काम नसल्यामुळे लातूर शहरातील मजूर आणि बिगारी कामगारांवर शहर सोडून जाण्याची वेळ आलीय. पोट भरण्यासाठी मजूर वर्गाने मुंबई, पुण्याचा रस्ता धरला आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर अनेक पालक शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. 

Updated: Mar 4, 2016, 10:31 AM IST
मुंबई-पुण्यात वाढतेय स्थलांतरितांची संख्या... title=

शशिकांत पाटील, लातूर : तीव्र पाणी टंचाई आणि हाताला काम नसल्यामुळे लातूर शहरातील मजूर आणि बिगारी कामगारांवर शहर सोडून जाण्याची वेळ आलीय. पोट भरण्यासाठी मजूर वर्गाने मुंबई, पुण्याचा रस्ता धरला आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर अनेक पालक शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. 

लातूरच्या महादेव नगरात राहणाऱ्या बळीराम रामजी येटेकर आणि त्यांच्या कुटुंबावर आपलं घरदार सोडण्याची वेळ आलीय. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही. लातूरमधील जनतेची दुष्काळाने अक्षरश: दैना केलीय. त्यामुळेच गाव सोडून जाण्याची वेळ येटेकर दाम्पत्यावर आलीय. केवळ गाडीभाड्यासाठी पैसे नसल्यामुळेचं त्यांना गाव सोडता येत नाही. मात्र, त्यांच्या दोन मुलांनी या आधीच लातूर सोडलं असून ते रोजगारसाठी मुंबईला गेले आहेत. 

 
पाणी टंचाई आणि दुष्काळाने केवळ गोरगरिबांचं जगणं  कठीण झालंय असं नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा जबर फटका बसला आहे. पाणी टंचाईमुळे लोक लातूर सोडून इतर गावात स्थलांतरीत होवू लागले आहेत. तर इतर गाव सोडण्याच्या तयारीत आहेत.

पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या लातूरमध्ये गेल्या चार वर्षापासून समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे  दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.पुढचे आगामी चार महिने लातूरमध्ये पाण्याची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर शहर सोडण्याशिवाय लोकांसमोर पर्याय उरला नाही.