जितेंद्र शिंगाडे, नागपूर : आता लग्नसराई सुरू झालीय... लग्नकार्यामध्ये महिलांचाच सक्रिय सहभाग असतो... पण, या लग्नसोहळ्यातल्या धामधूमीत सतर्क राहा, सावध राहा.... हौस नक्की भागवा पण नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही, याची काळजी नक्की घ्या... हे सगळं आम्ही का सांगतोय, पाहुयात...
लग्नसमारंभात लग्नघरची मंडळी घाईगडबडीत असल्याने अनेकदा मौल्यवान वस्तूंकडे दुर्लक्ष होतं... आणि याचाच फायदा चोर घेतात. नागपूरमध्ये अशा चो-या वाढल्या होत्या. कुसुमताई वानखेडे सभागृहात लग्नसोहळा होता. समारंभादरम्यान वधू-वराच्या बाजूला स्टेजवरून दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असलेली त्यांची पर्स चोरीला गेली. शोधाशोध करुनही पस साडली नाही, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. त्यानंतर लग्नाचं व्हिडीओ शूटिंग पाहत असताना एक अनोळखी महिला चोरी करताना दिसली. तेव्हापासून पोलीस या महिलेच्या मागावर होते.
लग्नसमारंभात चोरीच्या अशा घटना शहरात इतरही ठिकाणी झाल्या.. सक्करदरा, प्रताप नगर,बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये लग्नसमारंभात मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या होत्या. पोलिसांना काही घटनांमधलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं. पण ते स्पष्ट नव्हतं. पण लग्नातलं व्हीडिओ शूटिंग पाहिल्यानंतर पोलिसांची चक्रं फिरली. पोलिसांनी याप्रकरणी पन्नास वर्षांच्या विमल इंगळे आणि तिचा 20 वर्षांचा मुलगा करणला ताब्यात घेतलंय. विमल इंगळेच्या घराच्या झडतीत अनेक महागड्या साड्या, शालू, पर्सेस, किमती कॉसमेटीक्स, एटीएम कार्डस आणि विदेशी चलन सापडलंय.
आरोपी विमल इंगळेचा पती राजकारणात सक्रीय आहे तर दोन्ही मुलांना पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहरातून हद्दपार केलंय. ज्या लग्नात चोरीच्या घटना झाल्यायत, त्यांनी पुढे येऊन मुद्देमाल ओळखण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.