मुंबई : आजही कोकणची डबल डेकर रेल्वे ४ तास उशीराने धावत आहे. ही गाडी दोन तासांपासून कासू स्टेशनवर थांबवून ठेवल्याने प्रवासी रखडलेत. त्यामुळे अनेक गणेशभक्त संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे योग्य नियोजनामुळे कोकणचे वळणदार रस्ते मात्र सुकर झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन वाहतूक धिम्यागतीने सुरु आहे. वडखळ नाका कोंडी वगळता वाहतूक सुरळीत आहे.
एकीकडे गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना कोकणातल्या आपापल्या गावाकडे निघालेल्या गणेशभक्तांवर आलेलं विघ्न मात्र कायम आहे. कोकण रेल्वेवर गेल्या 5-6 दिवसांपासून सुरू असलेला खेळखंडोबा अद्याप सुरू आहे. अजूनही गाड्या उशिरानं धावात आहेत. डबल डेकर एसी प्रीमियम ट्रेनचा पुन्हा खोळंबा झालाय. डबल डेकर ट्रेन आजही चार तास उशिरानं धावतीये. ही ट्रेन कासू स्टेशनवर तब्बल दोन तासांपासून खोळंबल्यानं कोकणात जाणारे गणेशभक्त संतापलेत. त्याआधीही डबल डेकर ही पेठ स्थानकात दीड तास उभी होती. यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले आहेत.
रेल्वेवरील गाड्या तब्बल 8 ते 10 तास उशीराने धावत आहेत. यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. दादर टर्मिनस इथं गाडीच्या प्रतीक्षेत अनेक प्रवाशी आहेत.
दरम्यान, कोकण रेल्वेचा असा लेट मार्क असताना मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सुरळीत मात्र धीम्या गतीनं सुरू आहे. कोकणात जाणा-या वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वडखळ इथं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. तर मुंबई-पुणे महामार्गावर केवळ टोलनाक्यावर वाहनांची गर्दी दिसून येतेय. रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले असताना महामार्ग पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे आणि खबरदारीमुळे कोकणवासियांचा प्रवास सुखकर होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.