अपहरण करायचं... पैसेही स्वत:च भरायचे आणि ते वसूलही करायचे!

 अपहरण आणि खंडणीचं वेगळंच रॅकेट नागपुरात उघडकीस आलंय. आधी अपहरण करायचं, मग अपहरणाचे पैसे भरायचे आणि नंतर ते वसूलही करायचे... अशा या गोरखधंद्याचा मास्टरमाइंड आहे राजू भद्रे... नुकतीच, पावणे दोन कोटींच्या या खंडणी वसूल प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय.

Updated: Jan 29, 2016, 01:48 PM IST
अपहरण करायचं... पैसेही स्वत:च भरायचे आणि ते वसूलही करायचे! title=

अखिलेश हळवे, नागपूर :  अपहरण आणि खंडणीचं वेगळंच रॅकेट नागपुरात उघडकीस आलंय. आधी अपहरण करायचं, मग अपहरणाचे पैसे भरायचे आणि नंतर ते वसूलही करायचे... अशा या गोरखधंद्याचा मास्टरमाइंड आहे राजू भद्रे... नुकतीच, पावणे दोन कोटींच्या या खंडणी वसूल प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय.

कसा शिजायचा प्लान... 

११ डिसेंबर २०१५ ला नागपूरच्या त्रिमूर्ती नगर भागात सुरजन गोपी निवासी संकुलातून पेशानं बिल्डर आणि क्रिकेट बुकी असलेले अजय राऊत बाहेर पडले. ते दुचाकीवरून जात असताना कॉसमॉस टाऊनजवळ त्यांचं अपहरण करण्यात आलं. 

अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागितली. मात्र अखेर २ कोटी रुपयांवर मांडवली झाली. आपल्या दोन मित्रांशी संपर्क साधत राऊत यांनी ७५ लाखांची व्यवस्था केली. उर्वरित १ कोटींच्या रकमेसाठी त्यांनी त्यांच्याच ओळखीचा नागपूरचा डॉन राजू भद्रे याच्याशी संपर्क केला. 

भद्रेनं मदतीचं आश्वासन दिलं. थोड्याच वेळात अपहरणकर्त्यांना १ कोटी रूपये दिल्याचं भद्रेनं त्यांना कळवलं. अवघ्या काही तासात पावणे दोन कोटी रुपये मिळाल्यानं अपहरणकर्त्यांनी राऊतची सुटका केली. गुंडांकडून सुटल्यानंतर २ दिवसांनी त्यांनी डॉन राजू भद्रेचे १ कोटी रूपये परत केले.

कहानीत ट्विस्ट...

हे प्रकरण इथंच संपलं नाही, उलट कहानीत खरा ट्वीस्ट इथंच होता. हे अपहरणनाट्य डॉन राजू भद्रेनंच घडवून आणल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली. या अपहरणाचा पडद्यामागचा सूत्रधार तोच होता. दिवाकर नावाच्या गुंडामार्फत त्यानं हे अपहरण घडवून आणलं, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलीय.  

अजय राऊत यांच्याप्रमाणंच नागपूरच्या गुंडांनी अशाचप्रकारे खंडणी वसुली तर केली नाही ना, याचा तपास आता नागपूर पोलीस करतायत. एका डॉनची दोस्ती किती महागात पडू शकते, हेच या घटनेनं स्पष्ट केलंय.