निलेश वाघ, झी मीडिया, चंदनपुरी, मालेगाव : मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरीत खंडेराव महाराज यात्रौत्सवास उत्साहात प्रारंभ झालाय. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता.
जेजुरीनंतर महत्त्व असलेलं चंदनपुरी हे खंडेरायाची दुसरी पत्नी बानूबाईचं माहेर... इथंच बानूनं खंडेराव महाराजांची पूजाअर्चा केली आणि इथंच महाराज बानूच्या प्रेमात पडल्याची आख्यायिका आहे... बानू आणि खंडेरायाच्या आठवणी जागवण्यासाठी दरवर्षी पौष पौर्णिमेला इथं यात्रा भरते... या यात्रोत्सवात उत्साहात प्रारंभ झालाय...पुढचे पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणारेय...यात्रेनिमित्त ढोल-ताशांच्या गजरात आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडा-याची उधळण करत मानाची पालखी काढण्यात आली. देवदेवतांच्या मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात आली. देवाची तळी भरण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती...सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनीही राज्याच्या आनंदासाठी देवाची तळी भरली...
चंदनपुरी यात्रौत्सवाची सर्वदूर प्रचिती आहे. महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक यात्रा काळात इथं हजेरी लावतात... मानाच्या काठी आणण्याची प्रथा आहे...तळी भरणं, कोटम भरणं, नवस फेडणं आणि जागरण गोंधळाचे आदि धार्मिक कार्यक्रम भाविक भक्तीभावानं साजरे करतात...स्थानिक प्रशासनानं यात्रेसाठी जय्यत तयारी केलीय.
यात्रेनिमित्त चंदनपुरीत देवाच्या मूर्ती तसंच भंडारा, पूजेच्या साहित्यासह खेळणी, खाद्यपदार्थासह विविध दुकानं थाटलीय. तुम्हालाही बानूबाईच्या चंदनपुरीच्या यात्रेचा आनंद लुटायचा असेल तर नक्की या गावाला भेट द्या...