कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रविंद्रन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी रविंद्रन यांच्या बदलीवर नाराजी व्यक्त केलीय. विकासकामांना खीळ बसेल अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.
नवी मुंबई येथील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून रविंद्रन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी कल्याण डोंबिवलीच्या नव्या आयुक्तांबाबत मात्र शासनाने सस्पेन्स कायम ठेवला आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी म्हणजेच २३ जुलै २०१५ रोजी ई रविंद्रन हे महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाले होते.
कल्याण डोंबिवलीला बऱ्याच कालांतराने लाभलेले आयएएस दर्जाचे आयुक्त होते. त्यामुळं साहजिकच शहरांतील नागरिकांकडून त्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्यात रविंद्रन कितपत यशस्वी झाले? हा विषय वेगळाच आहे. मात्र, सुरुवातीला कल्याण पश्चिमेच्या शिवाजी चौकातील रस्ता रुंदीकरणानंतर तर त्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांच्या काळात डम्पिंग ग्राउंड, स्वच्छता यादीतील घसरलेला क्रमांक, नगरसेवकांबरोबरच राजकीय पक्षांची नाराजी, नागरी समस्यांचा उडालेला बोजवारा या पार्श्वभूमीवर रविंद्रन सतत नकारात्मक चर्चेत गाजत होते.
अचानक झालेल्या या बदलीमुळे महापालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून आता नवीन आयुक्त म्हणून कोण येतं? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.