राणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.

Updated: Oct 8, 2015, 03:58 PM IST
राणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून title=

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.

नारायण राणे यांच्या विरोधात बंड करून उमेदवार उभा केलेल्या संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांची नगराध्यक्षपदी तर त्यांच्या गटाच्या कन्हैया पारकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. हा राणे यांना मोठा झटका आहे.

अधिक वाचा : राणे हरलेत, 'ते' चक्क घालणार सोन्याच्या चपला ...

नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाविरोधात दंड थोपटत संदेश पारकर यांनी आपले स्वत:चे दोन उमेवार उभे केले. मात्र, त्यांचे उमेदवार पराभूत होतील, अशी चर्चा होती. परंतु पारकर यांना शिवसेना आणि भाजपने मदतीचा हात दिल्यामुळे माधुरी गायकवाड आणि कन्हैया पारकर यांचा विजय सोपा झाला. त्यामुळे राणेंना त्यांना या निवडणुकीत चितपट करण्यात यश मिळाले. 

काँग्रेसचे पारकर यांचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यामुळे नारायण राणे यांना घरचा आहेर मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभव आणि आता कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवामुळे राणेंपुढील राजकीय अडचणीत आणखी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

अधिक वाचा : राणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती : पवार

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माधुरी गायकवाड आणि राणे गटाच्या सुविधा साटम यांच्यात लढत होती. गायकवाड यांना एकूण नऊ मते मिळाली. त्यामध्ये शिवसेनेची चार, भाजपचे एक आणि पारकर गटाच्या चार मतांचा समावेश आहे. साटम यांना आठ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कन्हैया पारकर यांना ९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी बंडू हरणे यांना ८ मते मिळाली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संदेश पारकर काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्या गटामध्ये आले होते. मात्र, राणे गटातील नेते आपल्याला विश्वासात घेत नाहीत, अशी त्यांची नाराजी होती. त्यामुळे त्यांनी थेट राणेंनाच आव्हान दिले आणि ते पेलले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.