जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यात चार नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकेचा समावेश आहे. नगरपालिका निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना- भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केलीय. सध्या जालना आणि अंबड पालिकेत आघाडीची सत्ता आहे. परतूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे तर भोकरदन पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. जालना जिल्ह्यातली सत्ता काबीज करावी, यासाठी भाजप-शिवसेनेनं यावेळी आपली प्रचारयंत्रणा कामाला लावली आहे.
जालना नगरपालिकेत नवीन बदलाप्रमाणं 30 प्रभागातून 61 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला गटासाठी राखीव असेल.
अंबड नगरपालिका -
अंबड पालिकेत नवीन फेररचनेप्रमाणं 9 प्रभागातून 19 जागांसाठी निवडणूक होईल... पालिकेचं नगराध्यक्षपद हे मागासवर्गीय महिला गटासाठी राखीव आहे.
परतूर नगरपालिका -
परतूर पालिकेत यंदाच्या निवडणुकीत 10 प्रभाग असणार असून 20 जागांसाठी निवडणूक होणारेय. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातल्या महिला गटासाठी राखीव असेल.
भोकरदन नगरपालिका -
भोकरदन नगरपालिकेत 8 प्रभागातून 17 नगरसेवक निवडून द्यावे लागणार असून पालिेकेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असेल.
जालना पालिका निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अंबडमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपेंविरुद्ध भाजप-सेना आणि काँग्रेस अशी लढाई होण्याची शक्यता आहे.
परतूर पालिकेसाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकरांविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन पालिकेसाठी रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवेंविरोधात काट्याची टक्कर होईल असं बोललं जात आहे.
गेल्या पाच वर्षांत चारही पालिकांमध्ये कुरघोड्यांचंच राजकारण जास्त रंगलं. त्यामुळं विकास ढप्प आहे. समस्या जैसे थेच राहिल्या आहेत. यंदा तरी या समस्या दूर होतील का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.