आयसिसचं परभणी कनेक्शन

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता.

Updated: Jul 14, 2016, 08:17 PM IST
आयसिसचं परभणी कनेक्शन  title=

परभणी : आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता. मात्र महाराष्ट्र एटीएसच्या मुंबईमधल्या विक्रोळी पथकानं या कटातल्या दहशतवाद्याला परभणीतून वेळीच अटक केली आहे.

महाराष्ट्र एटीएसने परभणीमधून 31 वर्षीय नासीरबीन यफाई चाऊस याला अटक केल्यानंतर, हा धक्कादायक खुलासा झाला आहे. आयसीसीस या दहशतवादी संघटनेची ही दहशतवादी कारवाई होती. त्याकरता सिरीयातला आयसीसचा कमांडर फारुख यानं, नासीरबीन याफी चाऊसची निवड केली होती, पण त्याआधीच महाराष्ट्र एटीएसच्या मुंबईतल्या विक्रोळी पथकानं नासीरबीन याफी चाऊसला बेड्या ठोकल्या. 

नासीरबीन चाऊस हा फक्त आयसीस या दहशतवादी संघटनेचा समर्थक नव्हता. तर दहशतवादाचं ट्रेनिंग घेवून तो मुंबईत मोठी दहशतवादी कारवाई करणार होता. नासीरबीन याफी चाऊस याने सिरीयातला आयसीसीचा कमांडर फारुख याच्याकडून दहशतवादाचं ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं होतं. 

या ट्रेनिंगमध्ये नासीरबीनला उपलब्ध वस्तूपासून मोठ्या तीव्रतेचा बॉम्ब कसा बनवायाचा, स्फोटासाठी आवश्यक वस्तू कोणालाही संशय न येता बाजारातून कशा विकत घ्यायच्या, बनवलेल्या बॉम्बची चाचणी कशी करायची, गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब कसा ठेवायचा, बॉम्बच्या सहाय्यानं लोकांना ओलीस कसं ठेवायचं या सर्व गोष्टींचे ऑनलाईन ट्रेनिंग दिलं गेलं होतं.

नासीरबीन सोशल मीडियावर नाव बदलून सीरियातल्या आयसीसच्या मोहरक्यांच्या संपर्कातही होता. मुंबईत्या घातपाती कारवायांनंतर नासीरबीन आयसीससोबत दहशतवादी कारवाया करण्याकरता सिरीयालाही जाणार होता. मात्र त्याच्यावर नजर ठेऊन असलेल्या एटीएसला त्याच्या हालचालींचा संशय आल्यानं, त्यांनी त्याला वेळीच अटक केली. 

नासीरबीन याने बॉम्बचं सर्व साहित्य ट्रेनिंग दिल्या नुसार विकत घेतले होते. त्याने बॉम्ब देखील बनवायला सुरुवात केली होती. एवढचं नाही तर घातपाती कारवाया करण्यासाठी नासीरला इतर दहशतवादी तरुणांची मदत पुरवली जाणार होती. आयसीसने तयार केलेले हे इतर दहशतवादी तरुण कोण? याचा तपास आता एटीएस करत आहे.