नागपूर : जर सरकार भ्रष्टाचारावर अंकुश आणू शकत नसेल, तर नागरीकांनी कर भरू नये, असं मत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाने व्यक्त केलं आहे.
एका अपहार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे. एका आघाडीच्या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांनी या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराविरोधात एकत्र येऊन आवाज उठवावा, आणि टॅक्स भरण्यास नकार द्यावा, असं म्हटलंय.
मातंग समाजाच्या विकासासाठी, स्थापन करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या ३८५ कोटी रूपयाच्या भ्रष्टाचाराची सुनावणी सुरू होती.
त्यावेळी न्यायमूर्ती अरूण चौधरी म्हणाले, भ्रष्टाचाराची ही वाळवी संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. टॅक्स भरणाऱ्यांनी टॅक्स नाकारून असहकार चळवळ उभारावी, असं न्यायमूर्ती चौधरी यांनी म्हटलंय.