कसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड...

२६ मे रोजी डोंबिवलीकरांना हादरवून टाकणाऱ्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं खरं कारण आता समोर आलंय.  

Updated: Jul 22, 2016, 09:14 PM IST
कसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड... title=

डोंबिवली : २६ मे रोजी डोंबिवलीकरांना हादरवून टाकणाऱ्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं खरं कारण आता समोर आलंय.  

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील 'प्रोबेस कंपनी'त हा स्फोट घडून आला होता. या ठिकाणी वेल्डिंगचं काम सुरू होतं. यावेळी, वेल्डिंग करत असताना काही ठिणग्या जवळच असलेल्या केमिकलच्या संपर्कात आल्या. 

जिथं हे काम सुरू होतं त्याच्या बाजुलाच प्रोपार्जिल क्लोराईड केमिकलचा दोन ते तीन टन साठा ठेवण्यात आला होता. याच साठ्याशी ठिणग्यांचा संपर्क झाला... आणि भयंकर आगीला निमित्त मिळालं. 

उल्लेखनीय म्हणजे, प्रोपार्जिल क्लोराईड हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. याच केमिकलच्या एवढ्या मोठ्या साठ्याला आग लागली... आणि हा हा म्हणता म्हणता आजुबाजुचं सगळं काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. 

महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचलनालयानं दिलेल्या अहवालात ही गोष्ट नमूद करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या याचिकेला उत्तर देताना या गोष्टीचा खुलासा करण्यात आलाय.