प्रणव पोळेकर, रत्नागिरी : कोकाणामध्ये रत्नागिरीतल्या सावर्डे या गावी वेगळीच होळी पाहायला मिळते. सावर्ड्यात होळीच्या आधीच्या रात्री 'होल्टे होम' नावाने होळी खेळण्याची परंपरा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यामधल्या सावर्डे गावातला शिमगा, हा इथल्या होल्टे होमसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये होळीच्या आदल्या रात्री देवाच्या फडात म्हणजेत मैदानात गावकरी जमतात. त्यावेळी, होळी आधी सतत नऊ दिवस गावातल्या प्रत्येक वाडीत पेटवलेल्या होळीची पेटकी लाकडं म्हणजेच होल्टे हातात घेऊन, ढोलताशे आणि फटकांच्या आतिषबाजीत मैदानापर्यंत मिरवणूक काढली जाते.
मैदानात एका बाजूला गावातले मानकरी खोत तर दुसऱ्या बाजूला गुरव, गावकार असतात. दोन्ही गटांतली ही मंडळी हातातले होल्टे एकत्र करुन ते पेटवतात आणि पुन्हा ते पेटलेले होल्टे उचलून मैदानात एकमेकांच्या विरुद्ध बाजूला उभे राहतात. त्यानंतर तीन फाका मारुन आळीपाळीने हे दोन गट हातातले पेटते होल्टे एकमेकांवर फेकतात.
पूर्ण काळोखात सुरु असणारा हा खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. अशा प्रकारे परस्परांवर तीन वेळा होल्टे फेकल्यानंतर सर्व जण एकत्र येउन, होल्टे एकत्र करून त्याच फडात त्याचा होम पेटवून ग्रामदैवतेच्या नावानं फाक मारतात. पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेत कोणालाच इजा होत नसल्याचं गावकरी सांगतात.
गावातला सर्व समाज एकत्र येऊन ढोलताशे आणि सनईच्या तालावर हा आगळा वेगळा होल्टे होम साजरा करतो. अख्ख्या महाराष्ट्रातली अशा प्रकारची ही एकमेव वैशिष्ट्यपूर्ण होळी मानली जाते.