प्रणव पोळेकर, रत्नागिरी : कोकणात पारंपरिक वाद्य ढोलावर थाप पडू लागलेत. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेलीयत आणि होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवात रंग चढू लागलाय... शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव...
कोकणातल्या गावागावातील ग्रामदेवतांच्या मंदिरांचे देव्हारे आकर्षक फुलांनी सजवले गेलेत. ग्रामदेवतेला दागिन्यांचा साज चढवला गेलाय... मंदिरातील ग्रामदेवतांच्या पालख्या खऱ्या अर्थानं कोकणचं दर्शन घडवणाऱ्या कोकणी माणसाच्या शिमगोत्सावासाठी सज्ज झाल्यात. रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी खुर्दमधील शिमगा गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. महालक्ष्मी, महाकाली, सरस्वती, व्याघ्रांबरी पालखीत रूप बसवली जातात... रुपं लागणं म्हणजे पालखी सजवणे... पालखी जौखंब्यात बसवून साड्यांची रूपं लावतात... सोन्या चांदीच्या दागिन्यानं पालखी सजते आणि मग शिमग्यासाठी पालखी तयार होते.
कोकणातील प्रत्येक गावात शिमगोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रथा पाहायला मिळतात. वर्षानुवर्षांच्या निश्चित परंपरानुसार संपूर्ण गाव निश्चित दिवशी ग्रामदेवतेसमोर हजर राहतो... पालखी सजवतानाचा प्रत्येकाचा मान हे निश्चित असतात... तसंच गावात कुठलाही वाद विवाद न होता इथला शिमगा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
कोकणातील गावागावात शिमगोत्सवाच्या निमित्तानं विविध परंपरा जपल्या जातात... धुळवडीपर्यंत कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतांचे उत्सव वर्षानुवर्षाच्या परंपरा आणि मान जपत साजरा करतो... अनोख्या परंपरा जपत कोकणी माणूस या उत्सवाच्या काळात आपल्या ग्रामदेवते समोर नतमस्तक होतो. वर्षातून येणाऱ्या आपल्या ग्रामदैवतेचा उत्सवात ग्रामस्तांचा जल्लोष पाहायला मिळतो. फाक पंचमीला सुरु झालेला उत्सव आता थेट रंगपंचमीपर्यंत कोकणात हा उत्सव रंगेल...