मुंबई : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच ठिकठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. त्यासंबंधीच्या बातम्यांचा घेऊयात थोडक्यात आढावा.
नववर्ष स्वागतासाठी ठाण्यात भव्य रांगोळी रेखाटण्यात आलीय. भगवती शाळेच्या मैदानावर ही विक्रमी रांगोळी चितारली गेलीय. ३० कलाकारांनी ७ तास खपून, ४००किलो रांगोळी, ५०० किलो रंग, अडीचशे किलो मीठ वापरून ही रांगोळी साकारलीय.
नववर्षाच्या निमित्तानं नाशिकमध्ये पहाट पाडवा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. किराणा आग्रा घराण्याच्या गायिका शैला दातार यांच्या गायनाचा आस्वाद नाशिककर घेत आहेत.
ठाणे - ठाण्यातल्या बाजारपेठेत २८ फूट उंचीची पर्यावरणाभिमुख गुढी उभारण्यात आलीय. अवयव दान करण्याचा संदेश या गुढीच्या माध्यमातून देण्यात आलाय. सामाजिक संदेश देणारी ही गूढ सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरली होती.
धुळे - मराठी नव वर्षाचं स्वागत आपण सर्वच गुढी उभारुन करतो, आजच्या आधुनिक जगात तर गुढीचं स्वरुप हे दारावरच्या मोठ्या गुढ्यांपासून ते शोकेशमधील आकर्षक गुढयापर्यंत बदलंय. या बदलेल्या आकर्षक गुढ्यांची निर्मिती करण्याचं काम धुळ्यातल्या सन्मती विद्यालयातली गतीमंद मुलं मोठ्या कुशलतेनं करतात.
मासुंदा तलाव - नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातल्या मासुंदा तलावावर संध्याकाळी दीपोउत्सव साजरा कऱण्यात आला. यावेळी ठाण्याचं वैभव असलेला मासुंदा तलावाचा परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला. सोबतीला फटाक्यांच्या आतषबाजीसही आकाश दिवेही सोडण्यात आले.
उत्सवप्रिय ठाणेकरांनी नववर्षाच्या स्वागतासाठी ढोलताशांचा गजर केला. मोठ्या संख्येनं तरुणाईचा यात सहभाग होता. एक नाद एक ठेका यामुळे वातावरण यावेळी चांगलंच भारुन गेलं होतं. ढोलताशाच्या पथकानं यावेळी आपल्या कलेची चुणूक दाखवून वाहवा मिळवली.
डोंबिवली - गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत विविध ठिकाणी एकाच वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानिमित्तानं डोंबिवलीचा आसमंत फटाक्यांच्या झगमगाटाने उजळून निघतो. डोंबिवलीच्या गोग्रासवाडीत हा जल्लोष पाहायला मिळाला.
नागपूरमध्ये गुडीपाडव्याच्या पूर्व संध्येला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नववर्षाचं स्वागत केलं. हातात गुढ्या घेऊन या महिलांनी नागपूरच्या रस्त्यांवरुन स्कूटर रॅली काढली. नारी शक्तीचं स्वरूप दाखवत या महिलांनी नववर्षाचं स्वागताची सज्जता दाखवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.