एसी, कुलरशिवाय घराचं तापमान २४ अंश

सध्या विदर्भातला पारा ४५ डिग्री सेल्सियस आहे. अशा परिस्थितीतही गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या घरात गारवा आहे. 

Updated: Apr 27, 2017, 12:15 AM IST
एसी, कुलरशिवाय घराचं तापमान २४ अंश  title=

गोंदिया : सध्या विदर्भातला पारा ४५ डिग्री सेल्सियस आहे. अशा परिस्थितीतही गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या घरात गारवा आहे. काळेंनी बंगल्याच्या छतावर तनीस म्हणजेच शेतातल्या गवताचा सहा इंचाचा थर रचला. त्यावर एक दिवसाआड पाण्याचा मारा केला, त्यामुळे ४० अंश तापमानातही त्यांच्या घरात गारवा होता.  

१० एप्रिलनंतर मात्र पा-यानं ४५शी गाठली. त्यानंतर काळेंनी पहिल्या थरावर कागदी पुठ्ठे ठेवले आणि त्यावर पुन्हा सहा इंचाचा तनिसाचा थर रचला. त्यावर पाण्याचा मारा केला. त्यांचा हाही प्रयोग यशस्वी झाला. थोड्या खिडक्या उघड्या ठेवल्या की घरात एसीसारखा गारवा जाणवतो. घराचं तापमान सुमारे २५ अंशांच्या आसपास राहतं. मागच्या २४ दिवसांपासून त्यांनी घरात पंखाही लावलेला नाही.

वाढत्या सिमेंटच्या जंगल्यामुळे तापमानात वाढ होतेय. त्यामुळं एसी आणि कुलरशिवाय घरात राहणंही कठिण बनलंय. पण असा प्रयोग केला तर घरात गारवाही जाणवेल आणि विजेचीही बचत होईल, अशी प्रतिक्रिया काळेंनी दिली आहे.  जिल्हाधिका-यांच्या या प्रयोगाची माहिती मिळताच जिल्ह्यातले अनेक नागरिक याबाबतची माहिती घेण्यासाठी थेट जिल्हाधिका-यांनाच गाठतायत.