मालेगाव : गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने डॉ. अभिजित शिवाजी देवरे व त्यांचे बंधू डॉ. सुमित शिवाजी देवरे यांना येथील न्यायालयाने शिक्षा सुनावली. डॉ. अभिजित यांना तीन वर्षे कारावासाची तर डॉ. सुमित यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.
शहरातील सटाणा नाका भागातील शिवमंगल सोनोग्राफी केंद्र आणि कॅम्प रस्त्यावरील सीताबाई हॉस्पिटलच्या सहकार्याने हे गर्भलिंग निदान करण्यात आले होते. महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत गढरी यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
म्हैसाळचे प्रकरण ताजे असताना न्यायालयाच्या या निकालाने वैद्यकीय क्षेत्र हादरलंय. यानंतर प्रशासनलाही खडबडून जाग आलीय. नाशिक जिल्ह्यात बोगस डॉक्टर, गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे.
महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद या क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील समिती धडक मोहीम राबविणार आहे.