फ्रांसच्या'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये 'धागा' लघुपट

नागपूरच्या एका ध्येयवेड्या तरुण दिग्दर्शकाने बनवलेल्या 'धागा' या लघुपटाची फ्रांसच्या प्रतिष्ठित 'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 20, 2017, 09:51 AM IST
फ्रांसच्या'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये 'धागा' लघुपट title=

नागपूर : नागपूरच्या एका ध्येयवेड्या तरुण दिग्दर्शकाने बनवलेल्या 'धागा' या लघुपटाची फ्रांसच्या प्रतिष्ठित 'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. अनाथ, गरीब आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी आश्रयस्थान असलेल्या नागपुरातील बालसदनच्या मुलांनी या लघुपटात काम केले आहे.

नागपूरच्या काटोल रोडवरील बालसदनची सध्या सर्वत्र चर्चा आहे.. याला कारणही तसेच आहे... बालसदन मधील विद्यार्थांनी काम केलेल्या 'धागा' या लघुपटाची निवड फ्रान्सच्या 'कान्स'  फिल्म फेस्टिवल मध्ये झाली आहे.

या लघुपटात काम करणारे सर्व कलाकार हे नागपूरचेच... त्यातही सर्वच पहिल्यांदाच कॅमेरा समोर अभिनय करणारे.. साहिल केणे,प्रज्वल इंगळे, अभय चव्हाण व गौरव जैस्वाल या बालसदनच्या विद्यार्थांनी या लघुपटात काम केले आहे.

लघुपटात मुख्य भूमिका असलेला साहिल केणे हा नववीत शिकतो.. मुळचा भंडारा जिल्ह्यातील असलेला साहिलच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने बालसदन मधून तो सध्या शिक्षण घेतोय तर  तर इतर कलाकारांची देखील परिस्थिती काही वेगळी नाही..मात्र लघुपटात काम करताना खूप मज्जा आली आणि पुढेही संधी मिळाली तर सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे या बालकलाकारांचे म्हणणे आहे. 

राज गुप्ता या नागपूरच्या तरुणाने २० मिनिटांचा 'धागा' हा मराठी लघुपट बनवलाय.. सध्या राज गुप्ता हा मुंबईत अनेक हिंदी सिनेमात स्क्रिप्ट सुपरवाईजर म्हणून काम करतोय.. मात्र स्वतः आपण काही तरी करावे या जीद्दीपोटी त्याने धागा बनवलाय..संपूर्ण वैदर्भीय मराठी बोलीभाषेत त्याने हा लघुपट तयार केला आहे. 

सुमारे तीन वर्षापूर्वी बालसदन बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला होता.. त्यावेळी येथील लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न् निर्माण झाला होता.. शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी समोर येऊन प्रशासनाचा हा निर्णय बदलवून लावला होता.. आता लघुपटाच्या माध्यमाने प्रकाशझोतात आलेल्या बालसदनच्या या मुलांमुळे प्रशासनाचा निर्णय किती चुकीचा होता हे सिद्ध झाले आहे.