रेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Updated: Sep 9, 2016, 06:08 PM IST
रेल्वे पोलिसांचा महिलेवर  पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार title=

ठाणे : उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

यामध्ये दोन सहकाऱ्यांनी त्यांना मदत केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या महिलेने रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. 

उत्तर प्रदेशातील भदोरी येथील या महिलेचा अवघ्या १६ व्या वर्षी विवाह झाला असून तिला एक मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. सासरी छळ होत असल्याने ती आपल्या मुलीला घेऊन माहेरी गेली. मात्र तिला योग्य वागणूक न मिळाल्याने अखेर २०१४ साली तिने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. तेथून दिवा येथे एका भाड्याच्या खोलीत राहून ती नोकरी शोधत असतानाच तिची दिवा रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस हवालदार प्रदीपकुमार सिंग यांच्याशी ओळख झाली. तिच्याच गावाकडचे असल्याने तेव्हापासून ती त्यांच्या संपर्कात राहू लागली. यानंतर डोंबिवली येथील एका दुकानात तिला नोकरी मिळाली होती.

रेल्वे पोलिस हवालदार महेंद्रसिंग भगेल याने तिला फोन करून प्रदीपकुमार सिंग यांचा अपघात झाला असून ते फक्त तुमचेच नाव घेत असून तू चौकीत भेटायला ये, असे खोटे सांगितले. त्यामुळे पीडित महिला घाईघाईने पोलिस ठाण्यात पोहोचली असता तिला रेल्वे पोलिस हवालदार दीपक राठोड शीतपेय दिले. काही वेळाने प्रदीपकुमार याने तिला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये नेले. आत आधीपासून असलेल्या दीपक राठोड आणि प्रदीपकुमार सिंग उर्फ चाचा यांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात बी. के. सिंग याने आरोपींना मदत केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गुरुवारी ठाणे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल या गुन्ह्याचा तपास मुंब्रा पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.