रत्नागिरीतील किनाऱ्यांवर परदेशी पाहुण्यांनी हजेरी

जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय.. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. 

Updated: Nov 17, 2016, 12:05 AM IST
रत्नागिरीतील किनाऱ्यांवर परदेशी पाहुण्यांनी हजेरी title=

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय.. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. 

कोकणचे किनारे युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे गजबजून गेलेत. एका वेळी एका किना-यावर काही हजार सी-गल्स नावाचे पक्षी मुक्त विहार करताना पहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण ग्रीनलंड आणि युरोपातील हे सी-गल्स पक्षी न चुकता कोकणात येतात.

खरं तर कोकणातील किना-यांवर ज्याठिकाणी भक्ष्य लगेच सापडेल अशा ठिकाणी हे सी-गल्स पक्षांचा थवा उतरतो. सकाळी लवकर समुद्र किनारी दिसणारे हे पाहुणे दुपारच्या वेळी एकाच वेळी थव्यानं उडत खोल समुद्रात जातात. आणि पाण्यावर विहार करत आपले भक्ष्य शोधतात.केवळ हिवाळ्याच्या काळात हे पक्षी रत्नागिरी आणि परिसरातील किना-यावर येतात. आणि हिवाळा संपताच पुन्हा लाखो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भूमीत परततात.

कोकणच्या किना-यांवर सध्या मानवी पर्यटकांची गर्दी नाही. मात्र, हजारोंच्या संख्येने आले हे सी-गल्स पुढील काही दिवस कोकणचा पाहुणचार घेतील. दरम्यान, किना-यांजवळ प्रदुषण करणारे प्रोजेक्टचा विळखा वाढतोय. त्यात दूषित रसायनयुक्त पाण्यामुळे इथल्या जैवविविधतेला सध्या धोका निर्माण झालाय. त्यामुळेच हे प्रदूषण थांबवायला हवं. आणि निसर्गाचं सुरु असलेलं हे चक्र असचं अव्याहतपणे सुरु ठेवण्यासाठी हे किनारे जपणंही आता काळाची गरज बनली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.