सरकारच्या 'फी' माफिच्या घोषणा फोल; विद्यार्थी पेचात

दुष्काळामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली असतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काही अभ्याक्रमांच्या प्रवेश शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे. त्यामुळं सरकार एकीकडे फी माफीच्या घोषणा करीत असताना विद्यापीठानं फी वाढीचा घेतलेला निर्णय तुघलकी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतंय. 

Updated: Jan 21, 2016, 11:49 AM IST
सरकारच्या 'फी' माफिच्या घोषणा फोल; विद्यार्थी पेचात title=

विशाल करोळे, औरंगाबाद : दुष्काळामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली असतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काही अभ्याक्रमांच्या प्रवेश शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे. त्यामुळं सरकार एकीकडे फी माफीच्या घोषणा करीत असताना विद्यापीठानं फी वाढीचा घेतलेला निर्णय तुघलकी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतंय. 

मराठवाड्यात गेली तीन वर्ष भीषण दुष्काळाचं साम्राज्य पसरलं आहे. अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहे त्यात अनेकांना शिक्षणालासुद्धा मुकावं लागणार आहे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं परिक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र विद्यापीठानं या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत विनाअनुदानित कॉलेजेसच्या व्य़ावसायिक अभ्यासक्रमांच्या फी मधे भरमसाठ वाढ केली आहे. ही वाढलेली फी सरसकट खासगी कॉलेजांच्या संस्थांच्या तिजोरीत जाणार आहे. त्य़ामुळं दुष्काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठीची ही वाढ आर्थिक चटके देणारी आहे. विद्यापीठानं बीबीए, बीसीए, एमएस्सीसह नऊ अभ्यासक्रमांच्या शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे..

- मराठवाडा विद्यापीठानं बीबीएची ११ हजार पाचशेवरुन २३ हजार एवढी फी वाढ केलीय

- एमएससीची फी १६ हजारांहून ३२ हजारांवर गेलीय

- व्यवस्थापन शास्त्र म्हणजेच एमबीएसीची फी वाढ ही १२ हजारांहून २४ हजार 

- तर बीसीएमची ७ हजारांहून १४ हजारांवर गेलीय. 

हे सर्व अभ्यासक्रम खास करून खासगी कॉलेजात शिकवण्यात येतात त्यामुळं ऐन दुष्काळात विद्यार्थ्यांच्या हिताकडं दुर्लक्ष करीत विद्यापीठानं संस्थाचालकांच्या तिजोरी भरण्याचा घाट घातला आहे. यामुळं हजारो गरीब विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

ही फी वाढ सरत्या वर्षांपासून लागू करण्यात आली असून दुष्काळामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होत आहेत. त्यात विद्यापीठाचा हा निर्णय़ निश्चितच निंदाजनक आहे.

या विषयावर विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळं किमान कुलगूरूंनी तरी परिस्थिती लक्षात घेऊन केलेली ही फी वाढ दुष्काळी परिस्थितीपुरती तरी रद्द करावी इतकीच अपेक्षा दुष्काळाची झळ पोहचत असलेल्या विद्यार्थ्यांची आहे.