पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी, पुणे साखर संकुल तोडफोड प्रकरणी साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनाच जबाबदार धरलंय. भ्रष्ट साखर आयुक्त बिपीन शर्मा पैसे गोळा करण्यात गुंतले असल्याचा थेट आरोप करताना, सरकार त्यांना हटवत का नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.
सोबतच आपला ज्येष्ठ मित्र पक्ष भाजपवरच राजू शेट्टी यांनी शरसंधान साधलंय. काँग्रेस आघाडीचं सरकार आणि नव्या सरकारमध्ये फरक काय असा सवाल करत, भाजपलाच त्यांनी घरचा आहेरही दिलाय. त्याही पुढे जात ज्यांनी साखर कारखानदारी बुडवली त्यांचाच नवे सहकारमंत्री सल्ला घेत असल्याचा आरोपही शेट्टींनी केलाय.
कारखाने विक्रीची चौकशी कुठपर्यंत आली असा सवालही राजू शेट्टी यांनी केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. अडचणीत आलेल्या कारखान्यांना उभं करण्याचं सोडून त्यांना उध्वस्त करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घेतल्याचं ते म्हणाले. तर कारखान्यांचं ओझं सरकारनं का घ्यावं, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.