चिमुकल्यांनी इकोफ्रेंडली होळीसाठी सुरू केला कारखाना

जिल्ह्यातल्या सिंदोन गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी एक कारखाना सुरू केला आहे, इकोफ्रेंडली होळीसाठी. 

Updated: Mar 5, 2015, 11:12 PM IST
चिमुकल्यांनी इकोफ्रेंडली होळीसाठी सुरू केला कारखाना title=

औरंगाबाद : जिल्ह्यातल्या सिंदोन गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी एक कारखाना सुरू केला आहे, इकोफ्रेंडली होळीसाठी. 

चिमुकल्यांची ही लगीनघाई, कशासाठी ती? सिंदोन गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत या चिमुकल्यांनी रंगाचा कारखाना उघडलाय. कारखाना आणि चिमुकले धक्का बसला ना. मात्र हे सत्य आहे. होळीच्या रंगात रंगायचं आणि निसर्गाचं संवर्धन करायचं सोबत गावालाही चिमुकल्या हातानी मोठी मदत करण्यासाठी चिमुकल्यांचा हा खटाटोप सुरु आहे.

डोंगरद-यात वसलेल्या सिंदोन गावाच्या परिसरात पळसाची मोठ्या प्रमाणात झाडं आहेत. या मुलांनी पळसाच्या झाडाची १० पोती फुलं तोडून आणली आणि त्यापासून सुरु केली रंगनिर्मिती. अगदी १०० टक्के नैसर्गिक रंग. मुलांची जिद्द पाहून शिक्षकही मदतीला धावले आणि रंगाचा हा कारखाना जोमात सुरू झाला. 

पण पाऊस आला आणि शाळेच्या छतावर वाळलेली फुलं भिजली. त्यामुळं कोरडा रंग तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आला. मात्र थांबली ती मुलं कसली. मुलांनी आता ओला रंग बनवायला सुरुवात केली आणि त्यात मुलांना यशही मिळालंय. 

आता हा रंग भरण्यासाठी बाटल्या हव्या होत्या. बच्चेकंपनीनं गावातील बाटल्या उचलल्या आणि एका लग्नातून बाटल्या आणल्या. रंगाच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम गावातली नदी जिवंत करण्यासाठी वापरण्याचं या मुलांनी ठरवलंय. आहे ना, नवा पायंडा. 
 
रंग निर्मिर्तीतून नैसर्गिक होळी खेळण्याचं आवाहन ही मुलं करतायत. मुलांची ही वागणूक नक्कीच मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी अशीच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.