कल्याण : कल्याणचे नागरिक सध्या पुरते हैराण आहेत. एकीकडं डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीचा धूर आणि दुसरीकडं सलग तीन रात्री खंडित होणारा विद्युत यामुळं कल्याणकर सध्या नरकयातना भोगतायत.
रविवार, सोमवार आणि मंगळवार. या तिन्ही रात्री कल्याणकरांना धुरात आणि अंधारात काढाव्या लागल्यात. सलग तीन दिवस मध्यरात्री खंडित होणारा वीजपुरवठा आणि हे कमी की काय म्हणन डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग यामुळं कल्याणकरांची अक्षरशः झोप उडालीय.
आग आटोक्यात आली असली, तरी धुराच्या लोटांनी लाल चौकी, आग्रा रोड परिसर धुरानं व्यापून गेला होता. त्यात लाईट नसल्यामुळं दार बंद ठेवावं तर उकाडा आणि उघडावं तर धूर अशा दुष्टचक्रात कल्याणकर अडकले होते.
या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट व्हायचंय. कचऱ्यातून तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळं ही आग लागल्याचा अंदाज आहे. मात्र कल्याणकरांचे हाल होत असताना तथाकथित कल्याणकारी नेते मात्र विधान परिषद पोटनिवडणुकीत व्यस्त आहेत. तर महापालिका अधिकाऱ्यांनी स्वतःच्या तोंडालाच कुलूप ठोकलंय. त्यामुळं सामान्य नागरिकाचं चांगलंच कल्याण होतंय.