2003 ते 2016 मध्ये 6 खून, डॉ.संतोष पोळची धक्कादायक कबुली

साता-यातल्या मंगल जेधे खूनप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: Aug 15, 2016, 09:04 PM IST
2003 ते 2016 मध्ये 6 खून, डॉ.संतोष पोळची धक्कादायक कबुली  title=

सातारा : साता-यातल्या मंगल जेधे खूनप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी डॉ. संतोष पोळनं मंगल जेधेच्या खुनाआधी आणखी पाच खून केल्याची खळबळजनक कबुली दिली आहे. 2003 ते 2016 या कालावधीमध्ये संतोष पोळनं हे सहा खून केले आहेत. 

डॉ. संतोष पोळचा खुनी इतिहास

23 मे 2003 ला त्यानं सुरेखा चिकणेचा पहिला खून केला. 

12 ऑगस्ट 2006 ला वनिता गायकवाडचा खून करून तिला डोम धरणात फेकून दिलं.

15 ऑगस्ट 2010 ला जगाबाई पोळचा काटा त्यानं काढला.

10 डिसेंबर 2015 ला नथमल भंडारीचा खून डॉ. पोळनं केला.

17 जानेवारी 2016 ला त्यानं सलमा शेखचा बळी गेला.

जून 2016 मध्ये डॉ. पोळनं मंगला जेधेंचा खून केला.

महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या राज्य अध्यक्षा मंगल जेधे गेल्या 16 जूनपासून बेपत्ता होत्या. 11 ऑगस्टला डॉ. संतोष पोळ याच्या पोल्ट्री फार्म हाऊसवर त्यांचा मृतदेह सापडला. जेधेंच्या खूनप्रकरणी पोलिसांनी डॉ. पोळ आणि ज्योती मांढरे नावाच्या त्याच्या सहका-याला अटक केली, तेव्हा पोलीस तपासात त्यानं ही धक्कादायक माहिती दिली आहे. 

संतोष पोळच्या पोल्ट्री फार्महाऊसमधून पोलिसांनी आतापर्यंत चार मृतदेह उकरून काढलेत. या खुनांबद्दल त्याला कसलाही पश्चाताप नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हे खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.