धुळे : लागवड केलेल्या भाजीपाल्याला अक्षरशः मातीमोल भाव मिळत असल्यानं, धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातल्या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील मुळा पिकावर ट्रॅक्टर फिरवला.
सध्या मुळा पिकाला बाजारात किलोकरता फक्त चार रुपये भाव मिळत आहे. त्यातून लागवडीचा खर्च निघणं तर दूरच, पिक काढणीचाही खर्च निघणं अशक्य आहे. म्हणून संतप्त झालेले शेतकरी संजय माळी यांनी, दोन एकर शेतातलं मूळा पिक ट्रॅक्टरखाली चिरडून टाकलं.
मुळाबरोबरच पालक, वांगी, कोथिंबीर, उत्पादक शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे कापूस पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. शासनानं त्या शेतकऱ्यांना मंजूर केलेल्या अनुदानाची रक्कम अजून हाती आलेली नाही.
दुसरीकडे पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.