मुंबई : ट्विटर हँडलवरुन ठाणे पोलिसांकडे वाहतूक कोंडीची तक्रार करणाऱ्या नागरिकाला ठाणे शहर पोलिसांनी असमाधानकारक उत्तर दिलं. ठाणे शहर पोलिसांचं हे उत्तर मुख्यमंत्र्यांनी वाचल्यानंतर त्यांनी ठाणे पोलिसांना, विनम्रता आणि उत्तर देण्याची पद्धत योग्य शब्दात शिकवली. उत्तर सांगण्याची ही पद्धत योग्य नसल्याचं सांगत, उत्तर कसं असायला हवं, हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहर पोलिसांना ट्विटरद्वारे सांगून चांगलीच चपराक दिली आहे.
ठाण्यातील घोडबंदर परिसरात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एकानं ठाणे पोलीस, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना ट्विट केलं आणि मदतीची अपेक्षा व्यक्त केली. मदत करण्याऐवजी ठाणे पोलिसांनी मात्र नेहमीप्रमाणेच कागदी घोडे नाचवले. घोडबंदर नाका चौक ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचं ट्विट ठाणे पोलिसांनी केलं.
या दोन्ही ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीसांना टॅग करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलिसांना फैलावर घेतलं. हा प्रकार ठाणे ग्रामिण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येतो, आम्ही ही माहिती त्यांना कळवू असं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्यांनी अखेर ठाणे पोलिसांनी त्यांची चूक मान्य केली. तसं ट्विटच ठाणे पोलिसांनी केलं.