तापकीर यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुण्यातील चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अतुल यांच्या कुटुंबीयांनी केलीय. 

Updated: May 15, 2017, 04:33 PM IST
तापकीर यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी  title=

पुणे : पुण्यातील चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अतुल यांच्या कुटुंबीयांनी केलीय. 

पत्नीच्या छळाला त्रासून आत्महत्या करत असल्याची पोस्ट अतुल यांनी फेसबुकवर टाकल्यानं आधीच खळबळ उडालीय. दरम्यान कौटुंबिक हिंसाचार पीडित पुरुषांचा प्रश्नही यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आलाय

'ढोलताशे' या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येनं सिनेसृष्टीत खळबळ निर्माण झालीय. पत्नी तसंच तिच्या नातेवाईकांकडून झालेल्या छळाचं इत्यंभूत कथन अतुल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केलंय. ढोलताशे या चित्रपटाच्या निर्मितीतून झालेलं आर्थिक नुकसान आणि त्यामुळे  पती - पत्नीमध्ये आलेलं वितुष्ट हे त्यांच्या आत्महत्येचं कारण असल्याचं त्या पोस्टवरून स्पष्ट होतंय. 

अतुल यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केलीय. अतुलच्या कुटुंबियांनी मात्र अतुलच्या आत्महत्येस त्याची पत्नी प्रियांका जबाबदार असल्याचा दावा केलाय. त्यामुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय. 

अतुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये झालेल्या संभाषणाचे पुरावे कुटुंबियांनी पोलिसांकडे सादर केले आहेत. त्याचप्रमाणे अतुलने फेसबुकवर टाकलेली पोस्ट तसंच इतर चौकशीच्या आधारावर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 

महिलांप्रमाणे पुरूषही मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरत असल्याची प्रकरणं अलीकडच्या काळात वाढत आहेत. याबाबत वर्षाकाठी सुमारे ५० हजार तक्रारी पुरुष हक्क संरक्षण समितीकडे प्राप्त होत असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षांनी दिलीय. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याचा गैरवापर वाढत आहे. देशात महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोगाचीही स्थापना करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. 

अतुल तापकीर यांच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोपही होतोय. पत्नीच्या तक्रारीनंतर अटक टाळण्यासाठी म्हणून पोलिसांनी आपल्याकडून १० हजार रुपये घेतले होते असं अतुल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर म्हटलंय. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखीनच वाढलाय. 

दरम्यान अतुल यांच्या पत्नी प्रियांका यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांबद्दल त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे कळू शकलेलं नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे काय घडतं त्याला महत्व आहे.