कोल्हापूर : भाजपने कोल्हापुरात आपले बस्तान मांडण्यासाठी ताराराणी या स्थानिक पक्षाशी आघाडी केली. मात्र, त्यांना त्यात मोठे अपयश आले. तर काँग्रेसने आपले बस्तान चांगलेच बसविले. त्यामुळे पालिकेत त्यांच्या पक्षाचा महापौर बसणार आहे. काँग्रेसने 'हात' पुढे करत राष्ट्रवादीला सोबत घेत त्यांच्या पारड्यात उपमहापौरसह महत्वाचे स्थायी समिती सभापतीपद देण्याचे मान्य केलेय.
नव्या समीकरणामुळे कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता येणार असल्याचे मंगळवारी निश्चित झाले. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या वाटाघाटींनुसार पुढील एक वर्षासाठी महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात येणार आहे.
काँग्रेस नेते पतंगराव कदम, सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या झालेल्या चर्चेनंतर आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एक वर्षानंतर महापौर आणि उपमहापौर पदासंदर्भात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ निर्णय घेतील, असे एकमत झालेय.
कोल्हापूराच्या सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे आता निश्चित झालंय. काल संध्याकाळी ८१ पैकी २७ जागा मिळाल्यावर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. तेव्हापासूनच सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतं होती. ती खरी ठरलेय.
दरम्यान, आज हसन मुश्रीफ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम भेटीनंतर दोन्ही पक्षांचे नेते एकत्र पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा करतील, अशी माहिती देत पतंगराव कदम यांनी 'झी मीडिया'च्या बातमीला दुजोरा दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.