चिपळूण : वृध्द व्यक्तीचे संगोपन करण्यासाठी बरेच वृद्धाश्रम आपण पाहतो.. मात्र ज्यांना वृद्धाश्रमही नसतात, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी चिपळूण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय.
ज्येष्ठ नागरिकांची इथं विशेष काळजी घेण्यात येतेय. त्यांना काय हवं नको त्याची विचारपूस करण्यात येतेय.. त्यांची काळजी घेणा-या व्यक्तीही खास आहेत.. हे आहेत चिपळूण पोलीस स्टेशनचे पोलीस. हे पोलीस त्यांची छोटी मोठी सगळी कामं करतात.. त्यांचं दुखणं-खुपणं इथपासून ते औषधोपचारापर्यंत सगळ्या गोष्टींवर या पोलिसांचं खास लक्ष असतं.
इतकंच नाहीतर निवांत क्षणी आजी-आजोबांसह फोटोसेशनही होतं. हे सारं घडतंय ते चिपळूण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या कल्पनेल्या ज्येष्ठ नागरिक दत्तक योजनेतून, एक दोन नाही तर साडेनऊशे ज्येष्ठ नागरिकांना प्रमोद मकेश्वर आणि त्यांच्या टीमनं दत्तक घेतलंय..
या योजनेमुळं हे पोलीस आपल्या मुलांसारखेच असल्याची भावना या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलीय.
कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांबद्दल अनेकांच्या मनात भीती असते.. मात्र चिपळूण पोलिसांची खाकीआड दडलेली ही माणुसकी नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी म्हणावी लागेल.