मुंबई : रेल्वेतल्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीनं आणखी एका तरुणाचा बळी घेतलाय. भावेश नकाते असं अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दुर्देवी तरुणाचं नाव आहे. कोपर - दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात घडला.
सीएसटीकडे निघालेला अवघ्या २१ वर्षांचा भावेश डोंबिवलीत ट्रेनमध्ये चढला होता. सकाळी ८.५९ वाजता डोंबिवलीहून निघालेल्या या ट्रेनमध्ये खच्चून गर्दी भरली होती. त्यामुळे, भावेशनं ट्रेन तर पकडली पण त्याला आतमध्ये शिरण्यासाठी मात्र जागा उरलेली नव्हती... त्यामुळे तो दरवाजातच लटकलेल्या अवस्थेत उभा होता.
कोपर स्टेशन सोडल्यानंतर भावेशला तोल सांभाळणं कठिण झालं... आणि एका बेसावध क्षणी त्याचा हात सुटला आणि तो चालत्या रेल्वेच्या दरवाजातून खाली कोसळला.
उल्लेखनीय म्हणजे, भावेश ट्रेनमधून खाली पडतानाचा हा क्षण एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय.
अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी भावेशला शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केलं पण एव्हाना त्याचा मृत्यू झाला होता. डोंबिवलीला राहणारा भावेश एका लॉजिस्टिक कंपनीसाठी काम करत होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.