सावंतवाडी : कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.
सिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रा ही महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. गुरुवारी दोन मार्चला यंदाही यात्रा संपन्न होत आहे. जत्रेसाठी दरवर्षी भाविकांच्या गर्दीचा आकडा हा दहा लाखांच्या दरम्यान असतो. यंदाही तेवढीच गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केलीय. यंदा भाविकांच्या दर्शनासाठी तब्बल नऊ दर्शनरांगाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पहाटे ३ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होईल.
आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळही यात्रा सुखकर पार पाडावी यासाठी सज्ज झाली., महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि अनेक राज्यातून भाविक या यात्रेत सहभागी होतात. भाविकांसोबतच चाकरमानी आणि ग्रामस्थांमुळे आंगणेवाडी गजबजून गेलीय.
कोकणची दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष रेल्वे, जादा एसटी बसेस आणि सोबत खासगी वाहतुकीमुळे जिल्ह्यातील सर्वच रस्ते आंगणेवाडीच्या भाविकांमुळे फुलून गेलेत.